मुंबई । नगर सहयाद्री:-
देशातील दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून यावर काम सुरू असून, ही योजना या वर्षाअखेरीस लागू होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित योजनेनुसार, स्वयंरोजगारित व्यक्ती आणि असंघटित क्षेत्रातील कामगार स्वेच्छेने या योजनेत सहभागी होऊ शकतील. यामध्ये किमान मासिक योगदानाव्यतिरिक्त अधिक रक्कम जमा करण्याची सोय उपलब्ध असेल. जमा केलेल्या एकूण रकमेनुसार निवृत्तीनंतर पेन्शनचे स्वरूप ठरेल. या योजनेसाठी कोणतीही सक्ती नसणार आहे.
जे दुकानदार किंवा व्यावसायिक आपल्या भविष्यासाठी बचत करू इच्छितात, ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणार आहे. योजनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नियमित योगदानासोबतच जास्तीची रक्कम एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने जमा करण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. यामुळे पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होईल. तसेच, पेन्शन कधीपासून सुरू करायचे याबाबतही काही प्रमाणात लवचिकता दिली जाण्याची शक्यता आहे.
श्रम मंत्रालयाने या योजनेसाठी असंघटित क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत केली आहे. देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवणे हा या योजनेमागील उद्देश असू शकतो.