Gautam Adani News भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतली एका कंपनीने गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अदानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदाणी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदाणी समूहाकडून उत्तर दिले गेले नाही. याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आरोप केले होते, अदाणी समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते.
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट, यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यामध्ये भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.