अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दिल्लीगेट परिसरात दोन गटात झालेला राडा हा जुन्या वादातून झाल्याचे समोर आले असून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याने 13 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन दिपक पवार, शिवम दिपक पवार, आदित्य लहु सकट, आदर्श रमेश साळुंखे, प्रशांत प्रदिप दळवी, गणेश संतोष भुजबळ, हर्षल लक्ष्मण सारसर, अमोल उर्फ भैय्या गोरे, किरण बापू जरे, चेतन रविंद्र निंदाणे, राहुल अंबादास रोहकले, अयान शेख आणि यश प्रदिप पवार यांच्यासह 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी रोहन जयेंद्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत रोहन, त्यांचे चुलते जितेंद्र चव्हाण, पत्नी निलम चव्हाण आणि टायपिस्ट प्रियंका कांबळे गंभीर जखमी झाले. तोफखाना पोलीस ठाण्यात या 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर हकीगत अशी की, 24 जुलै 2025 रोजी दुपारी सव्वा दोन वाजता रोहन चव्हाण आपली 3 वर्षांची मुलगी रूहीला शिशु संगोपन शाळेतून घरी आणत असताना, आरोपींनी त्यांचा मोटरसायकलवरून पाठलाग केला. घरी पोहोचल्यानंतर, सायंकाळी सव्वातीन वाजता, पवन पवारच्या नेतृत्वाखाली 14 ते 15 जणांचा जमाव लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि धारदार शस्त्रे घेऊन रोहन यांच्या घरात घुसला. त्यांनी रोहन यांची आजारी आत्या गिता चव्हाण यांना मारहाण केली. घरातील सामानाची तोडफोड केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. यानंतर, रोहन यांच्या ऑफिसवर हल्ला करून त्यांना, जितेंद्र चव्हाण, निलम आणि प्रियंका कांबळे यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी महिलांना लज्जास्पद धक्काबुक्की आणि शिवीगाळही केली.
रोहन यांनी दिलेल्या जबाबानुसार, 2017 मध्ये पवन आणि शिवम पवार यांनी असाच हल्ला केला होता. ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. यामुळे आरोपींचा राग वाढला आणि त्यांनी सातत्याने रोहन यांच्या कुटुंबाला त्रास दिला. 22 जुलै 2025 रोजी रस्ता अडवून आणि अलील हावभाव करून त्यांनी धमक्या दिल्या होत्या, ज्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवली गेली होती.