अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल रघुनाथ राहिंज (वय 45, रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, बुरुडगाव रोड) आणि सहकारी राहुल सिताराम शिलावत यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी नगरसेवक अमोल येवले आणि 12 ते 15 अनोळखी व्यक्तींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिनांक 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:20 वाजता भुषणनगर, शाहूनगर, महाठे मार्केट आदी भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री 9:20 वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अमोल येवले आणि त्यांच्यासोबत 12-15 जणांनी कार्यालयात प्रवेश करत राहिंज यांना शिवीगाळ केली. तुम्ही काय काम करता, फक्त मोबाइल खेळता, असे म्हणत त्यांनी खुर्च्या, रजिस्टर फेकले.
यावेळी अज्ञात व्यक्तीने राहिंज यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने हल्ला करत जखमी केले. सोडवणूक करणाऱ्या शिलावत यांनाही मारहाण आणि धमकी देण्यात आली. राहिंज यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.