अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात प्रवचना दरम्यान एक धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वक्तव्यामुळे वैजापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, जमावाने रात्री आठच्या दरम्यान घोषणाबाजी करत टायर देखील जाळले. सदर प्रकरणामुळे तणाव आणि अस्थिरतेची स्थिती निर्माण झाल्यावर पोलिसांनी आवश्यक तातडीच्या उपाययोजना केल्या असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि चुकीचे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. वैजापूर तालुक्यात 16 ऑगस्ट रात्री 12 ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित करण्यात आली आहे.
महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप एका धर्माच्या काही समाजाने केला. या विधानामुळे भावना दुखावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील येवला व मनमाड शहरातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती अशी माहिती समोर आली आहे.
अहमदनगरमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावर
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर आले. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अहमदनगर मधील डीएसपी चौकात मोठा जमाव जमला होता. जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.