अप्पा चव्हाण । नगर सहयाद्री
शेतकरी शेतीत उत्पादन घेतो. पण शेतमाल नसल्याने कवडीमोल दारात विक्री करावी लागते .कमी दरात विक्री केल्याने शेतकरी तोट्यात जातो, पण व्यापारी मात्र मालामाल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेत पाऊल टाकले पाहिजे हाच हेतू समोर ठेवून ऋषिकेश बाळासाहेब गोरे हा अवघा २४ वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा कांदा व्यापारातून व फ्रुट विक्रीतून वर्षाकाठी तब्बल १० ते १२ लाखांचा निव्वळ नफा कमावत आहे.
ऋषिकेश हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखलठणवाडी गावचा. बीसीए शिक्षण उत्तीर्ण असूनही नोकरी न मिळाल्याने सुरुवातीला लिंबू आडतीवर काम केले. दरम्यानच्या काळात नंतर लिंबू विक्री व्यवसाय सुरू केला. पण त्यातूनही त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते.
गावात शेती होती.
शेतीतून चांगले उत्पन्न निघत होते पण पुरेसा दर मिळत नव्हता. शेतकरी भरडला जात होता. पण व्यापारी मात्र कायम मालामाल होत होते हे त्याच्या डोक्यात होते. पुण्यात नोकरीच्या हिशोबाने त्याने २०२३ मध्ये पुणे गाठले. नोकरीचे शोधाशोध करत असताना पुणे मार्केट मध्ये गेले असता तेथील कांदा बाजारातील दर पाहून शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करून व्यापारी जास्त दरात विक्री करतात असं त्याच्या लक्षात आलं आणि कांदा विक्रीचा व्यापार करण्याची कल्पना सुचली.
पुढे २०२३ साली ऋषिकेशनी कांद्याच्या व्यापाराला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला भरपूर अडचणी आल्या. कांदा कुठे विकावा? त्याचा सौदा कसा करावा? कोणत्या मार्केटमध्ये चांगला दर मिळतो? असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते. कांदा बटाटा व फळे थोडी थोडी विक्री करण्यास सुरुवात केली. कांद्याच्या व्यापारातून तो दिवसाला दोन ते तीन लाखाची उलाढाल करतो. आणि दहा ते बारा लाख रुपयांचा वर्षाला निवळ नफा कमावतो. हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा त्याचा मानस आहे.
शेतकऱ्यांना फसवण्याची भावना नाही
जे पूर्णवेळ व्यापारी असतात त्यांना शेतकऱ्यांना तोटा होतो. याचे फारसे घेणे देणे नसते. पण ऋषिकेश शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात तो कांदा विक्री करतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजारपेठे संदर्भात आणि दरासंदर्भात मार्गदर्शनही करतो. किती काळ कांदा ठेवावा, भविष्यात दर मिळेल की नाही असा सल्लाही तो देतो. व्यवसाय करत असताना फक्त एकच व्यवसाय करून चालत नाही त्याच्या जोडीला इतर व्यवसाय असायला हवेत म्हणून ऋषिकेशने मागच्या दीड वर्षापासून फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरावे
शेतकऱ्यांना कसं पिकवावे हे सांगायची गरज पडत नाही, तर कसं विकावं हे सांगणं गरजेचं असतं. विक्री व्यवस्था शेतकऱ्यांना जमत नाही म्हणून आज शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरले पाहिजे व्यापार काय आहे ते समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांना व्यापार समजणार नाही तोपर्यंत शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. आपण उत्पादित केलेला माल आपणच विक्री करावा लागेल तेव्हा शेती कुठेतरी नफ्यात येईल.
– ऋषिकेश बाळासाहेब गोरे (शेतकरी, कांदा व्यापारी, श्रीगोंदा )