अहमदनगर । नगर सहयाद्री:-
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब थोरात यांनी लाडकी बहिण नाही तर लाडकी सत्ता योजना असल्याची टिका केली होती. यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, नाचता येत नाही अन अंगण वाकडं, अशी थोरातांची अवस्था झाली आहे. नगर जिल्ह्यात सात लाख बहिणींनी अर्ज दाखल केला आहे.
थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात ८० हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. बहिणींनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तुमच्यावर लोकांचा विश्वास नसेल त्याला आम्ही काय करणार? असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर केला आहे. ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने सत्ता मिळवण्यासाठी त्यांची कोणत्याही स्तराला जाण्याची यांची तयारी असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.
लोकसभेला खोटे नेरेटिव्ह सेट केले, अपप्रचार करुन लोकांची दिशाभूल केली. आताही ते भ्रामक कल्पनेत आहेत की, विधानसभेलाही तेच होईल असे विखे पाटील म्हणाले. तर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने असल्याचा टोलाही विखे पाटलांनी लगावला. तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे संजय राऊत म्हणत आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरेल. याच मुद्यावर विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना विखेंनी जोरदार टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर युतीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले..
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. बैठका, चर्चा, दौरे सुरु केले आहेत. नेते आपापल्या पक्षांची भूमिका समजावून सांगत आहेत. दोन्हीकडील नेते आमचीच सत्ता येणार असा दावा करताना दिसत आहेत.