इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विरोधात भाजपची महिला आघाडी आक्रमक | तीव्र आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून हिंदू सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच दैनंदिन विद्यार्थिनींना हातात बांगड्या घालणे मेहंदी काढण्यास तसेच कपाळावर गंध किंवा टिकली लावण्यास, राखी किंवा गंडा बांधणे आदींबाबत बेकायदेशीरपणे बंधने घालत सक्तीने शिक्षा करत विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांसाठी 30 ऑगस्ट 2023 रोजी विद्यार्थिनींना याबाबत शारीरिक व मानसिक शिक्षा न करण्याचे परिपत्रक काढले आहे.
मात्र शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्या परिपत्रकास केराची टोपली दाखवत विद्यार्थिनींना शिक्षा करत पालकांनाही अपमाकारक वागणूक देत मानसिक त्रास देत असल्याचे दिसून आले आहे. भारतात राहून जर भारतीय परंपरा व संस्कृती पाळण्यावर बंदी असेल तर अशा शाळांवर शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत मान्यता रद्द करावी. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन न झाल्यास शहर भाजपा महिला आघाडी या शाळांच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शहर भाजपच्या महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
भारतीय संस्कृती व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या शहरातील शाळांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत शहर भाजपा महिला आघडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, कालिंदी केसकर, ज्योती दांडगे, सविता कोटा, श्वेता पंधाडे, सुरेखा जंगम, रेणुका करंदीकर, ज्येष्ठ नेते गोकुळ काळे आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर मधील काही इंग्लिश मिडीयम शाळा लहान विद्याथ व विद्यार्थिनींवर बेकायदेशीर बंधने घालत आहेत. त्यांचा मानसिक छळ करीत आहेत. भारतीय संस्कृतीनुसार रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी इत्यादी सणांच्या वेळी हातात राखी बांधणे, बांगड्या घालणे, कपाळावर टिळा लावणे, हातात गंडा बांधणे, मेहंदी काढणे इत्यादी गोष्टी मुलं मुली परंपरा म्हणून पाळत असतात. परंतु काही इंग्लिश माध्यमाच्या शाळा अशा गोष्टींना बंदी घालत आहेत.
असे कृत्य विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. टिळा पुसायला लावणे, टिकली काढणे, बांगड्या काढायला लावणे, वर्गाबाहेर उभे करणे अशा पद्धतीची शिक्षा करणे किंवा घरी पाठवणे अशा पद्धतीची अपमानकारक वागणूक दिली जाते. पालकांनी तक्रार केल्यास, विद्यार्थ्यांचा दाखला शाळेतून काढून घ्या असे सांगितले जाते. काही शाळा हिंदू विद्यार्थ्यांना हावभावासहित काही विशिष्ट धर्माची प्रार्थना व गाणी म्हणण्याची सक्ती केली जाते.
भारतात राहून जर भारतीय परंपरा व संस्कृती पाळण्यावर बंदी असेल तर अशा शाळेची मान्यता शासनाने काढून घ्यावी. केंद्र सरकारचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवून अशा प्रकारची बंदी जर विद्यार्थ्यांवर कोणती शाळा घालत असेल तर शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत त्या शाळेची मान्यता रद्द करावी, अन्यथा भारतीय जनता पाट महिला आघाडीला याविरूद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.