अहदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातील न्यू टिळक रोडवर पटेल मंगल कार्यालयाकडे वळणाऱ्या चौकात भरधाव वेगातील ढंपरने मोटार सायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील प्राथमिक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. संजय बाबाजी वामन (वय ५१, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर, मूळ रा. देवगाव, ता.नगर) असे या मयत शिक्षकाचे नाव आहे.
मयत संजय वामन हे नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथील कोल्हेटेक वस्तीवरील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शनिवारी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन समुपदेशाने बदलीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी ते नगर शहरात आले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास ते न्यू टिळक रोडने हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर (क्र. एम.एच.१६ सी. आर. ९५८२) जात असताना सक्कर चौकातून आयुर्वेद चौकाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ढंपरने नंदनवन हॉटेलच्या पुढे पटेल मंगल कार्यालयाकडे वळणाऱ्या चौकात त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.
या धडकेत संजय वामन हे ढंपरच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाले. अपघातानंतर ढंपर चालकाने ढंपर वेगात पुढे नेवून तो पसार झाला. अपघातानंतर परिसरातील दुकानदारांनी व काही नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावून मयत वामन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत संजय वामन यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.