संगमनेर / नगर सह्याद्री
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यामुळेच भारताच्या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेच्या पवित्र ग्रंथाचे महत्व अधोरेखित केले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्या वतीने तसेच लोणी बु. येथे जनसेवा युवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्यात आले. संविधान ग्रंथाचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. लोणी बु. येथील कार्यक्रमात किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारताच्या पावन भूमीत अनेक महापुरूषांनी जन्म घेतला. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पराकोटीचा संघर्ष केला. अशा थोर महापुरूषां मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व हे अष्टपैलू होते. सामाजीक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व विषयांमध्ये त्यांचे ज्ञान खुप मोठे होते. समाजातील वंचीत आणि सोशितांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच ते क्रांतीचे जनक म्हणून ओळखले गेले.
शिक्षणानेच समाजाची वैचारीक क्षमता वाढेल, यातून त्यांना हक्काची जाणीव होईल. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाचा शेवटपर्यंत प्रसार केला. यातूनच समाजामध्ये क्रांतीकारी बदल झाले. जातीभेदाची किड नष्ट झाल्याशिवाय देश एकसंघ होणार नाही. अशी ठाम भूमीका असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या उक्ती आणि कृतीमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. केवळ त्यांच्या नावाचा उपयोग करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते. ही खंत त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करण्याची घोषणा करून एकप्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाच उचीत गौरव केला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब पहायला मिळते. इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम राज्य सरकार लवकरच पुर्ण करणार असल्यची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
संगमनेरात केले अभिवादन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विवाह सोहळ्याच्या निमिताने संगमनेर तालुक्यात होते.शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.आ.अमोल खताळ आरपीआयचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.