अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा संदेश नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिला आहे.
आज (बुधवार) त्यांनी कापड बाजार व सरजेपुरा परिसरातील व्यापारी, स्ट्रीट फूड विक्रेते व नागरिकांशी संवाद साधला. रस्त्यांची अवस्था बिकट असूनही व्यापारी दिवसभर परिश्रम घेत नागरिकांना सेवा देत असल्याचे पाहून गाडे यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी ‘फ्रेंड्स कॉर्नर’ या स्ट्रीट फूड स्टॉलवर मालक भूषण नेमाडे यांच्या हातचा स्वादिष्ट नाश्ता घेतला आणि स्थानिक व्यवसायांना पाठबळ देण्याचा संदेश दिला.
नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले —
“मी एक स्वाभिमानी हिंदू आहे. या दिवाळीत आपल्या स्थानिक भावंडांकडूनच खरेदी करा. ऑनलाइन शॉपिंगपेक्षा आपल्या शहरातील व्यापाऱ्यांकडून खरेदी करणे हेच खरे हिंदुत्व आणि स्वदेशीचा उत्सव आहे.”
तसेच त्यांनी सांगितले की — “रस्त्यांची अवस्था जरी कठीण असली तरी व्यापारी आणि विक्रेते दिवाळीचा आनंद नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. आपण सर्वांनी मिळून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.”
गाडे यांनी नागरिकांना स्वच्छतेचे पालन करण्याचे, तसेच प्रशासनाने रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता टिकवून ठेवावी, असेही आवाहन केले.