सुपा शहरात विश्रांतीनंतर पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू, दोन दिवस काढली जाणार अतिक्रमणे
सुपा / नगर सह्याद्री
Ahmednagar breaking : सुप्यातील अतिक्रमनांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बेधडक कारवाई केली. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी अतिक्रमण हटावची कारवाई झाल्याने चर्चेचा विषय ठरला. शनिवार दि. २५ रोजी सुपा बसस्थानकापासून ते एमआयडीसी चौकापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांना ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकात संपर्क कार्यालय होते. हे कार्यालय अतिक्रमणात असल्याने लंके यांच्या कार्यालयावर शनिवार दि.१ जून रोजी हातोडा टाकला.
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता बांधकाम विभाग, चेतक एंटरप्रायजेस यांच्या वतीने अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. हि मोहीम सुरू असताना काही अतिक्रमण धारकांनी आम्हाला ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी अशी विनंती केली. या विनंतीला मान देत अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती. ३० तारखेचा दिलेला शेवटचा अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा शनिवार दि.१ जून रोजी दुपारी २ वाजता मोठा फौजफाटा बसस्थानक परिसरात दाखल झाला. व राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.
दरम्यान सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले होते. परंतू स्वत: हून अतिक्रमणे काढली जात नव्हते. मध्यंतरी लोकसभा निवडणूक लागल्याने ही मोहीम थंडावली होती. मात्र शनिवार दि. २५ रोजी व शनिवार दि. १ रोजी दुपारी २ वाजता पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. व उर्वरित अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळ समोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापुर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीन दोस्त करण्यात आले. तर औद्योगिक चौक ते नगर – पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली असून ही मोहीम दोन दिवस चालणार आहे.
अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपर्या जमीनीच्या लेवलला नेल्या जात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुपा – पारनेर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर चोर्यांचे प्रमाण वाढले होते. हे सर्व अतिक्रमण काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. उर्वरीत नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमणे उद्या रविवार दि. २ रोजी काढण्यात येणार असल्याचे माहिती अतिक्रमण मोहिमेद्वारे देण्यात आली.