Crime News: वसईतील थरारक पाच खून प्रकरणातील आरोपीला अखेर तब्बल 17 वर्षांनंतर अटक करण्यात वसई गुन्हे शाखेला यश आलं आहे. सावत्र आई, तीन अल्पवयीन भावंडं आणि एका मित्राची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतलं आहे. अक्षय शुक्ला असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. पोलिसांनी अनेक वर्षांच्या तपासानंतर या गुन्ह्यात मोठं यश मिळवलं आहे.
आरोपी अक्षय शुक्ला 17 वर्षांपूर्वी पाच जणांचा जीव घेऊन फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने अनेक युक्त्या केल्या. विविध ठिकाणी नावे, ओळखी बदलून राहतो होता. मात्र शेवटी पोलिसांच्या चक्रव्यूहातून तो सुटू शकला नाही. वसई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईने एक जुना पण भीषण गुन्हा पुन्हा उजेडात आला आहे.
या प्रकरणात आरोपीने आपल्या सावत्र आईवर घरातील जबाबदाऱ्या नीट न सांभाळल्याचा राग ठेवत तिला आणि तिघा अल्पवयीन भावंडांना गळा दाबून ठार केलं. ही घटना घडल्यानंतर तो तेथून पळून गेला आणि थेट वसईत येऊन राहू लागला. वसईत तो एका ओळखीच्या मित्राजवळ राहात होता. काही काळानंतर घराच्या जागेवरून झालेल्या वादातून त्याने त्या मित्राचीही हत्या केली होती.
ही सर्व प्रकरणं त्याकाळी मोठ्या खळबळजनक ठरली होती. मात्र आरोपी पळून गेल्याने केस थंडावली होती. पोलिसांनी दरम्यान वेळोवेळी तपास सुरूच ठेवला होता. आरोपीबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनंतर बंगळुरूमध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. आता आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास अधिक खोलात होणार आहे. 17 वर्षांपूर्वी घडलेला हा गुन्हा अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न उभे करतो.
पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा आढावा घेत असून, आरोपीने या वर्षांमध्ये कोणते बनावट कागदपत्रे वापरली, कुठे कुठे लपून राहिला, याचा तपास सुरू आहे.वसई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखवलेली चिकाटी आणि सातत्य अखेर फळाला आली आहे. या अटकेमुळे एक जुना आणि थरारक गुन्हा न्यायाच्या दृष्टीने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.