शिर्डी / नगर सह्याद्री –
शिर्डीतील हॉटेल साई शुभम समोर सोनुकुमार ठाकूर या 18 वर्षीय युवकावर काही युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच दोन्ही आरोपी युवकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींना राहाता न्यायालयाने मंगळवार पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिर्डीतील चौका-चौकात काल दहीहंडीची धूम सुरू असताना शिर्डीतील अहमदनगर-मनमाड महामार्गावर मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिर्डीतील साई कुमावत (वय १९ ) आणि शुभम गायकवाड(वय १९) या दोघांनी शिर्डीतीलच सोनुकुमार ठाकूर या युवकावर जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकूर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन फरार आरोपींचा शोध घेत अवघ्या 2 तासांतच आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.