Crime News: मी तुला या वर्षी राखी बांधू शकणार नाही रे..असं सुसाईड नोटमधून भावाला सांगत एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. तू माझ्यापेक्षा लहान आहेस आता स्वतःची काळजी स्वतःच घे असं म्हणत २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. श्रीदिव्या असं या विवाहितेचं नाव असून ही घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा या जिल्ह्यातली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे.
श्रीदिव्या या महाविद्यालयीन प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचं लग्न सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं. रामबाबू असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच रामबाबू आणि त्याच्या घरातल्यांनी श्रीदिव्याचा छळ करण्यास सुरुवात केली. ज्या छळाला कंटाळून श्रीदिव्याने भावाच्या नावे सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
श्रीदिव्याने जी सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये ती म्हणते, “रामबाबू रोज दारु पिऊन घरी येत होता. त्यानंतर तो माझा शारिरीक छळ करायचा. मला शिव्या द्यायचा. तू युजलेस आहेस असं म्हणायचा. कुठल्याही महिलेसमोर तिचा अपमान करायचा. डोक्यावर आणि गालावर चापट मारायचा आणि त्यानंतर आपलं डोकं गादीच्या दिशेने ठेवून पाठीत बुक्के मारत होता. त्यामुळे माझं अंग रोज दुखायचं. हुंडा घेऊन ये म्हणून सांगायचा.
या सगळ्याला कंटाळून मी आयुष्य संपवते आहे. तुला राखी बांधू शकणार नाही. तू तुझी काळजी घे.” असं सुसाईड नोटमध्ये सांगत श्रीदिव्याने आयुष्य संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
श्रीदिव्याने तिच्या सुसाईड नोटमध्ये हे ठळकपणे नमूद केलं आहे की तिच्या आत्महत्येला तिचा नवरा आणि सासरचे लोक जबाबदार आहेत. माझ्या मृत्यूनंतर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा असंही श्रीदिव्याने म्हटलं आहे. या प्रकरणात आता पोलीस तपास करत आहेत. आमच्या मुलीने ज्यांच्यामुळे आत्महत्या केली त्या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी श्रीदिव्याच्या कुटुंबाने केली आहे.