मुंबई | नगर सहयाद्री:-
राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत असला, तरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नव्या चक्रीवादळामुळे पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली असून, राज्यातील हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील उत्तर भागात तापमानात घट होत असून, खानदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये पारा १४ अंशांच्या खाली गेला आहे. थंडीचा जोर वाढू लागला असला तरी, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील हवामानात मोठे बदल होत आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील काही भागांवर होऊ शकतो, असे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसाढवळ्या उन्हाचा चटका कायम असून, रात्रीच्या सुमारास थंडीची चाहूल लागली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस तर धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारपर्यंत थंडीचा जोर आणखी वाढेल. उत्तर भारतातील थंड वाऱ्यांमुळे हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश या भागांतही तापमानात घट होत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश दिसत असले, तरी वातावरणातील अचानक बदलामुळे काही ठिकाणी पावसाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.



