सुपा । नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हिजी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुपा पारनेर रस्त्यालगत जांभूळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये आयुश अग्रवाल यांची व्हिजी कार्बन कंपनी आहे.
या कंपनीत टायरपासून ऑईल तयार केले जाते. यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात टायर ठेवले होते. विस्ताराने मोठ्या असलेल्या या कंपनीत गुरूवार दि. २६ रोजी पहाटे अचानक आग लागली. कंपनीत टायर असल्याने बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. यादरम्यान कंपनी परिसरात धूराचे लोटच्या लोट निर्माण झाले होते.
कंपनीच्या मागील बाजूस लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे टायर खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगर येथील अग्निशमनच्या गाड्या बोलाविण्यात आल्या. मात्र नेहमी प्रमाणे गाड्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत टायरने आणखी पेट घेतला.
काही वेळाने अहिल्यानगर येथून अग्निशमनच्या दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. सकाळपासूनच औद्योगिक वसाहतीमध्ये धूराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी ते पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कामगारांची सुरक्षिता रामभरोसे
सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांचे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी फायर ऑडीट होणं गरजेचं आहे, फायर ऑडीट होत नसल्याने सुपाएमआयडीसी मधील कामगारांची सुरक्षिता रामभरोसे आहे. हे दुर्दैवी आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवणार आहे.
– मनसे नेते अविनाश पवार