पारनेर | नगर सह्याद्री
माजी आमदार व शिवसेनेचे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी आज मंगळवारी सकाळी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेतली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी पारनेरमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत घोषणा करु असे विजय औटी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार माजी आमदार विजय औटी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडून झाल्यानंतर औटी यांनी मंगळवारी निवडक पदाधिकार्यांची बैठक घेतली.
सर्वांची भूमिका समजावून घेत विजय औटी यांनी सर्वांच्या सहमतीचा निर्णय आपण दि. १ मे रोजी जाहीर करू आणि हाच आपणा सर्वांचा निर्णय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. औटी यांची भूमिका नगर लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले होते.
आज त्यांनी भूमिका जाहीर करत महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच औटी यांनी विखे यांना पाठिंबा दिल्यामुळे माजी आमदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे.
मी स्वतः, रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी असे आम्ही पाच जणांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने तालुक्यातल्या आम जनतेने विचारपूर्वक ज्याला लोकसभेच्या कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि अधिकची पाच वर्षे जर त्यांना मिळाली तर आणखीन एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असं आमचं मत आहे. म्हणून मी पंधरा वर्षे आमदार असताना ज्या कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिल. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत ही माणसं माझ्याशी प्रामाणिक राहिली त्या सर्वांना माझे आवाहन आहे की सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा. तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मला कधीही फोनवर संपर्क करा असे आवाहन माजी आमदार विजय औटी यांनी केले.