मुंबई। नगर सहयाद्री
मीरा रोड परिसरात रविवारी रात्री दोन गटात राडा झाला. यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रात्री ११ च्या सुमारात हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.
पोलीस उपायुक्त जयंत बजबाळे म्हणाले, काल रात्री ११ च्या सुमारास मुंबईजवळील मीरा रोड परिसरातील नया नगर भागात एका गटाकडून तीन-चार वाहनांमधून घोषणाबाजी सुरु केली. यामुळे दुसर्या गटासोबत त्यांचा वाद होऊन परिसरात दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीची घटना घडली.
दरम्यान, परिस्थिती बिघडत चालली असल्याचे लक्षात येताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि काही लोकांना ताब्यात घेतले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी फ्लॅगमार्च केला. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सुपे यांनी सांगितले की, २१ जानेवारीला साडेदहा वाजता किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद झाला. सध्या तणाव निवळला असून सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसेच संभ्रम निर्माण करून घेऊ नये. सोशल मीडियावर येणारे मेसेज खात्री केल्याशिवाय कोणीही फॉरवर्ड करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.