श्रीरामपूर । नगर सहयाद्री
श्रीरामपूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या कंपनीत फर्निचर तयार केले जाते. यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तु होत्या.
विस्ताराने मोठ्या असलेल्या या कंपनीत शुक्रवारी अचानक आग लागली. कंपनीत लाकडी फर्निचर असल्याने बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. यादरम्यान कंपनी परिसरात धूराचे लोटच्या लोट निर्माण झाले होते.
शॉर्ट सर्किटमुळे कंपनीला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोकडे आणि ओताडे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये अचानक धूराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी ते पहाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.