अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नेवासा मतदारसंघाचे उबाठा गटाचे माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांना कायदेशिर कचाट्यात गुंतविण्याची चाल आता खेळली जात आहे. मतदारसंघात मोठा दांडगा संपर्क आणि जनतेच्या गळ्यातील ताईत झालेल्या गडाख यांनी महायुतीला झुगारुन उबाठा शिवसेनेसोबत राहण्याचा आणि तेथूनच उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गडाख यांच्या विरोधात इन्कमटॅक्ससह अन्य विभागांचा ससेमिरा लावल्याचे समोर आले आहे.
त्याचाच पहिला भाग काल झाला आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शंकरराव गडाख यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलीच शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांच्यावर दबाव टाकण्याचा या प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केवळ एकाच कारखान्याला नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत.
मुळा एज्युकेशन संस्थेच्या निमित्ताने याआधी गडाख यांना घेरण्याचा पहिला प्रयत्न झाला. त्यावेळी गडाख यांना थेट पोलिस ठाण्यापर्यंत धमक्या देण्यात आल्या. मात्र, गडाख यांनी न्यायालयात दाद मागितली. आता विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असताना गडाख हे बधत नसल्याचे पाहून त्यांना कायदेशिर कचाट्यात अडकविण्याची खेळी खेळली जात असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शंकरराव गडाखांच्या एकमेव साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मला व्यक्तीगत पातळीवर घेरले; आता माझ्या संस्थांनाही घेरण्याचा केविलवाणा प्रयत्न!
नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचे काम आणि त्यांनी घालून दिलेली शिस्त, कामाची पद्धत याबाबत माहिती आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शवत वाटेवरच आमची वाटचाल चालू आहे. कारखान्यात एक रुपयाचीही गडबड झालेली नसताना फक्त आणि फक्त माझी आणि माझ्यासोबत असणाऱ्या तालुक्यातील जनतेची अडवणूक करण्याचा आटापिटा यातून समोर आला आहे. यामागे राजकारण आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या कारवाई विरोधात कार्यकर्ता मेळावा घेणार आहे. यापूव सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. जनता सोबत असल्याने आणि चुकीचे काहीच केले नसल्याने मी या दबावाला बळी पडणार नाही. आमच्या कुटुंबाला व्यक्तीगत पातळीवर जाऊन घेरण्याचा आणि पोलिस ठाण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला. गडाख साहेबांना या वयात कोर्टकचेऱ्याच्या कामात गुंतवून त्यांच्या भावनांशी खेळले जात आहे. आता संस्था टार्गेट केल्या जात आहेत. या साऱ्यांच्या मागे राज्यातील मोठी शक्ती काम करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तालुक्यातील जनता मतपेटीतून प्रत्युत्तर देईल याचा मला विश्वास आहे.
– आ. शंकरराव गडाख