मुंबई । नगर सहयाद्री:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात इनकमिंगला वेग आला आहे. विशेषतः तेजस ठाकरे यांच्या शिंदेसेनेत प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेत प्रवेश करणारे तेजस ठाकरे म्हणजे तेजस गोविंद ठाकरे, हे उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक नाहीत, मात्र त्यांच्या आडनावामुळे हा प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि महागाव तालुक्यातील ठाकरे गट व काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात तेजस ठाकरे यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशावेळी मंत्री संजय राठोड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला भाजपमध्ये सक्रिय असलेले तेजस ठाकरे आता शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश महागाव शहर आणि तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो, असे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे. या भव्य पक्षप्रवेशाने ठाकरे गट आणि काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला आहे.