श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
मजुरांचे पैसे देण्यास चाललेल्या मुकादमास सहा ते सात जणांनी सिनेस्टाईल पद्धतीने राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात लुटले असता स्थानिक गुन्हे शाखेने अल्पवधित यातील चार आरोपींना वाकडीत पकडले. फिर्यादी दारासिंह तुकाराम डावर, ( रा. नांदूर, ता. राहाता ) हे दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी मजुरांना पैस वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर येथे अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारने डावर यांच्या मोटार सायकलला धडक दिली व त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 5 लाख 18 रुपये रोख रक्कम हिसकावून चोरून नेली.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आला. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, रमिजराजा आत्तार व अरूण मोरे यांचे पथक तपासासाठी रवाना केले.
पथकाने घटनेच्या ठिकाणी भेट देवून आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा आरोपी इम्रान आयुब शहा, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह केला असून गुन्हा करतेवेळी वापरलेल्या गाडीसह स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच-20-सीसी-9500 मधून गणेशनगर येथून वाकडी रोडने श्रीरामपूरकडे येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकातील पोलीस अंमलदारांनी वाकडी येथे सापळा रचून संशयित स्विफ्ट कार थांबवून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेत असताना एक संशयित आरोपी पळून गेला. उर्वरित 4 आरोपींना ताब्यात घेतले. त्यात आरोपी इम्रान आयुब ( शहा, रा.आशीर्वादनगर, वॉर्ड नं. 1), आनंद अमर पवार, ( रा. दत्तनगर, श्रीरामपूर ) शादाब अब्बास शेख, ( रा.दत्तनगर, श्रीरामपूर ) रितेश बाबासाहेब आढाव,( रा. दत्तनगर श्रीरामपूर ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पळून गेलेल्या साथीदाराबाबत माहिती विचारली असता अमीत पठारे ( रा. बेथेल चर्चजवळ, सुतगिरणी, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले.
तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली. आरोपींकडून 3 लाख रुपये रोख रक्कम, 60 हजार रुपये किमतीचे 4 मोबाईल, 4 लाख 50 हजार रुपये किमतीची पांढर्या रंगाची स्विफ्ट कार व 1 हजार रुपये किमतीची एक लोखंडी कत्ती असा एकूण 8 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या रक्कमेबाबत चौकशी केली असता आरोपी आनंद अमर पवार याने इम्रान आयुब शहा याचे सांगणेवरून शादाब अब्बास शेख, रितेश बाबासाहेब आढाव व अमीत पठारे अशांनी मिळून फिर्यादीच्या मोटार सायकलला धडक देऊन लोखंडी कत्तीचा धाक दाखवून पैशाची बॅग जबरीने घेतली.
जप्त करण्यात आलेली रक्कम ही चोरीमधील प्रत्येकच्या वाटणीस आलेली आहे, अशी माहिती सांगितली. आरोपी इम्रान यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सुरज सोपान मुठे, रा. मुठेवडगाव व ऋषीकेश उर्फ सोन्या किशोर पागीरे, रा. कांदा मार्केटजवळ, श्रीरामपूर हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात. त्यांनी दारासिंह डावर हा दर महिन्याला श्रीरामपूर येथील व्यापार्याकडून 5 ते 6 लाख रुपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटारसायकलवरून बॅगमध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती.
इम्रान व सुरज मुठे यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी ऋषीकेश पागिरे यांच्या मदतीने फिर्यादीस लुटण्याचा कट केला. 28 नोव्हेंबर रोजी डावर हा मार्केट यार्ड येथून पैस घेऊन निघाल्याची माहिती ऋषीकेश पागीरे याने इम्रान शेख व सुरज मुठे यांना दिली. सुरज मुठे याने डावर हे पल्सर मोटार सायकलवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून इम्रान शेख यास दारासिंग डावर दाखवून दिला. त्यानंतर इम्रान शेख व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीचा अस्तगाव रोडपर्यंत पाठलाग करुन फिर्यादीस लुटल्याची माहिती दिली. तसेच चोरी केलेली काही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. ताब्यातील 6 आरोपीना गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.