श्रीरामपुर। नगर सहयाद्री-
वैद्यकीय व्यवसाय करण्याची शासनाची परवानगी व डॉक्टरची पदवी नसतानाही जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दवाखाना थाटणाऱ्या सागर आहिरे या बोगस (मुन्नाभाई) डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोंधवणी येथील अरुण शिंदे यांनी माळेवाडी येथे एक डॉक्टर वैद्यकीय पदवी नसताना प्रॅक्टीस करत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. सदर तक्रारीनंतर तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांनी याबाबत दखल घेत आपल्या पथकासह माळेवाडी येथे सुरू असणार्या ‘श्वास’ क्लिनिकला भेट दिली.
पथकाने तपासणी केली असता त्या ठिकाणी अॅलोपॅथीची औेषधे, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, तपासणी टेबल, वाफेचे मशिन आदी साहित्य आढळून आले. क्लिनिकमध्ये सागर याचे वैद्यकीय सेवा नोंदणी दाखला आढळला नाही. त्याच्याकडे पथकातील प्रमुखांनी विचारणा केली असता त्याने वडाळा महादेव येथील शरदचंद्र होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याची माहिती दिली.
पथकाने शरदचंद्रजी पवार होमिओपॅथी मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र देवून सागर आहिरे याच्याविषयी माहिती विचारली असता 22 नोव्हेंबर 2017 मध्ये सागर आहिरे हा कॉलेजमध्ये प्रवेशित असून बीएचएमएस चतुर्थ वर्षाची हिवाळी 2023 ची परिक्षा त्याने दिलेली आहे. त्यामध्ये तो अनुत्तीर्ण झालेला, असा अहवाल प्राचार्यांकडुन प्राप्त झाल्यामुळे सागर आहिरे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे