बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बनावट शाळा सोडल्याचा दाखला, बोगस कर्ज मंजुरी पत्र आणि खोटे बँक स्टेटमेंट सादर करून दोघा इसमांनी महामंडळाकडून व्याज परतावा लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गौरव शंकर मंचरे (रा. साकुरी, ता. राहाता) आणि राहुल बाळासाहेब चोळके (रा. साकुरी, ता. राहाता) या दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महामंडळाचे जिल्हा समन्वयक शिवतेज सुरेश नळे (वय २५, रा. साकुरी) यांनी गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ‘MAHASWAYAM’ या पोर्टलद्वारे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय कर्जावर व्याज परतावा दिला जातो. यासाठी अर्जदाराला आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला यासह कर्ज मंजुरी पत्र, रि-पेमेंट शेड्युल, लोन अकाउंट स्टेटमेंट अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
मात्र, आरोपी गौरव मंचरे आणि राहुल चोळके यांनी संगनमत करून वरील सर्व कागदपत्रे बनावट तयार केली. त्यांनी खोटे कर्ज मंजुरी पत्र, खोटे रि-पेमेंट शेड्युल आणि बोगस बँक स्टेटमेंट पोर्टलवर अपलोड करून शासनाकडून वेळोवेळी व्याज परताव्याच्या रकमा लाटल्या आणि शासनाची फसवणूक केली.
सन २०२३-२४ मध्ये नाशिक येथे असाच प्रकार उघडकीस आल्याने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व जिल्हा कार्यालयांना चौकशीचे आदेश दिले होते. अहिल्यानगर कार्यालयाने केलेल्या चौकशीत मंचरे आणि चोळके यांचा हा घोटाळा उघडकीस आला. शिवतेज नळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



