Ahilyanager Crime News: नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक या तरुणाचा मृतदेह त्यांच्या रहात्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या संत्र्याच्या बागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन त्याच्या शरीरावरील खुणा पाहुन हा घातपाताचा प्रकार असल्याचे समजते.
पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक (वय-३५) या इसमाचा मृतदेह त्यांच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या संत्र्यांच्या बागेत आढळुन आला. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमावरुन हा घातपातच असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या डोक्याला मार असुन पाय मोडुन टाकलेले दिसत असुन पाठीवर तसेच हातावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्यावरुन हा घातपातच असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सोमनाथ पाठक याचे तिसगाव येथे मेडिकल दुकान होते परंतु काही कारणास्तव ते त्यांनी काही दिवसापुर्वी बंद केले असल्याचे समजते. त्यास एक मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकास व ठसे तज्ज्ञास पाचारण केले. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनास पाठवला आहे.