अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मधील आरडगाव शिवारातील मुळा नदी पात्रात अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तात्काळ राहुरी पोलिसांनी धाव घेतली परिसराची पाहणी करून मृतदेह शिव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आरडगाव येथील काळे- देशमुख मुळा थडी परिसरात आज मंगळवार दिनांक.७ जानेवारी रोजी सकाळी येथील एका शेतकऱ्याला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटील लक्ष्मण जाधव दिली.
सदर खबर राहुरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सुरेश सय्यद, संभाजी बडे, प्रविण खंडागळे, रोहित पालवे आदि पोलीस पथकाने धाव घेतली मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दुपारी उशिरापर्यंत मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती. अंदाजे 35 ते 40 वयोगट असलेला व अंगावर निळा शर्ट व काळी पॅंट असा पेहराव असलेला हा इसम आहे.