कोल्हापूर / नगर सह्याद्री –
कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांसमोच एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात थेट कुऱ्हाड घातली. या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना बेगळाव जिल्ह्यातील अथणी येथे घडली. या घटनेमुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या अथणी न्यायालयात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्यायधीशासमोरच एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या घटनेमुळे न्यायालयात गोंधळ घडाला. जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय ५० वर्षे) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण या व्यक्तीने मीनाक्षी यांच्यावर हल्ला केला. संपत्तीच्या वादातून मीनाक्षी आणि बाबासाहेब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच विषयावरून दोघांच्यामध्ये अनेकदा भांडण झाले होते. याचाच राग काढत मीनाक्षी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
आज पाठलाग करत बाबासाहेबने कोर्टात मीनाक्षी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी महिला कोर्ट हॉलमध्ये घुसली. प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोर घडलेल्या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. महिलेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अथणी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे कोर्ट परिसरात गोंधळ उडाला.



