अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
केडगाव परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दोन भावांना जखमी केल्याची घटना शनिवारी (6 सप्टेंबर) दुपारी लिंक रस्ता परिसरात घडली. दिनेश रामाश्री जैसलवार (वय 19) आणि त्यांचा भाऊ मंगलेश रामाश्री जैसलवार (वय 21, दोघे रा. दत्तचौक, भुषणनगर, केडगाव) असे जखमींची नावे असून, सध्या दोघेही जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दिनेश जैसलवार हे नेप्ती टोलनाक्यावर मजुरीचे काम करतात. शनिवारी दुपारी त्यांना मोठा भाऊ प्रदीप जैसलवार यांनी फोनवर कळविले की, पेट्रोलपंपाजवळ उभा असताना शेजारी राहणार्या रोहित बनसोडे याने काहीही कारण नसताना त्यांना मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हे समजताच दिनेश तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे प्रदीप उभे होते; त्यानंतर मंगलेशही तेथे आल्यावर तिघांनी मिळून रोहित बनसोडेला कारण विचारले. दरम्यान, या विचारणेतून रोहित संतापला व शिवीगाळ करत तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी देत त्याने दुचाकीवरील डिकीतील कोयता काढून प्रदिपवर वार करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी दिनेश यांनी भावाला वाचवण्यासाठी पुढे जाताच रोहितने थेट त्यांच्या डोक्यात दोन वार केले. एवढ्यावर न थांबता त्याने मंगलेशच्या डोक्यातही कोयत्याने वार केला. या रक्तरंजित हल्ल्यानंतर रोहित बनसोडे घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचा उपचार सुरू आहेत. या संदर्भात जखमी दिनेश यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबावरून रोहित बनसोडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भुषणनगर, केडगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.