सेन्सेक्स 3000 ने आपटला । निफ्टीमध्येही 1100 अंकांची घसरण
नवी दिल्ली | नगर सह्याद्री
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरताना दिसतोय. कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी 1100 अंकांनी घसरून 21,800 च्या पातळीवर आला. तर सेन्सेक्स 3300 अंकांच्या घसरणीसह 71,900 च्या आसपास होता.
बँक निफ्टी तब्बल 2000 अंकांनी घसरला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 3400 अंकांनी घसरून 47,249 वर आला. इंडिया व्हीआयएक्स 56 टक्क्यांनी वधारला आहे. बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 19.39 लाख कोटी रुपयांची घट झाली.ट्रम्प टॅरिफमुळे सलग तीन दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांनादेखील बसला.
गिफ्ट निफ्टी 900 अंकांनी घसरून 22,100 अंकांवर तर निक्केई 6 टक्क्यांनी म्हणजेच 2300 अंकांनी घसरून बंद झाला. वास्तविक, जोरदार विक्रीमुळे अमेरिकन बाजारात खळबळ उडाली होती. शुक्रवारी बाजार 5 वर्षांतील सर्वात मोठी घसरण होत शेअर बाजार 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. डाऊ 2250 अंकांनी तर नॅसडॅक जवळपास 1000 अंकांनी घसरला.
आर्थिक मंदीची भीती
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे महागाई वाढेल, कंपनीचा नफा कमी होईल अशी अपेक्षा आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेपी मॉर्गनने अमेरिकन आणि जागतिक स्तरावर मंदीची शक्यता 40% वरून 60% पर्यंत वाढवली आहे. त्यांच्या मते अमेरिकेचे हे धोरण दीर्घकाळ असेच चालू राहिले तर त्यामुळे जागतिक मंदी येईल हे जवळपास निश्चित झाले आहे. भारतावर त्याचा थेट परिणाम मर्यादित असू शकतो, परंतु जागतिक मंदीच्या प्रभावापासून तो पूर्णपणे अस्पर्श राहू शकत नाही.
टॅरिफ मागे घेणार नाही; डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणात लादलेल्या आयात शुल्क (टॅरिफ) वाढीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसत आहे. बाजारपेठेत मोठी घसरण होत असताना ट्रम्प यांनी टॅरिफ मागे घेणार नाही. यापुढे अमेरिका व्यापार तूट सहन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जगभरातील शेअर बाजार कोसळू नयेत असे आम्हाला वाटते. आम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये घसरण घडवून आणायची नाही. मात्र कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी वेदनादायक औषध घ्यावे लागते. ट्रम्प यांनी आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि देशातही त्यांचे निषेध सुरू झाले आहेत हे उल्लेखनीय आहे. तथापि, ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयापासून मागे हटण्यास नकार दिला आहे.
जागतिक बाजारपेठेतही शेअर बाजाराच्या गटांगळ्या
दरम्यान, मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच जागतिक बाजारपेठेतही मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. वॉल स्ट्रीट आणि इतर आशियायी बाजारपेठांप्रमाणेच जपानमधील एमएससीआय 6.8 टक्क्यांनी घसरला तर निक्केई 6.5 टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.
सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदार हवालदील
सोमवारच्या व्यवहारांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची दहशत दिसून आली. बँकिंग, तंत्रत्रान आणि ऑटोमोबाईल या नेहमी गुंतवणूकदारांना हात देणाऱ्या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून जगभरातल्या देशांवर व्यापार कर आकारण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून खुद्द अमेरिकन शेअर बाजारातही मोठी पडझड झाली. या पार्श्वभूमीवर अमेरिकन जनता देखील ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले आहे.