स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा
शिर्डी । नगर सहयाद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात अधिक मजबुतीने काम करेल आणि मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यत केले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार चव्हाण यांची निवड झाल्यानंतर विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून, शुभेच्छा दिल्या.
या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आणि त्यानंतर सलग चार वेळा आमदार झाले. कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची वाटचाल राहिली आहे.
विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. सरकार आणि संघटना यातील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करीत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम पाठबळ ते उभे करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच भाजप पहिल्या क्रमांकाचे यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.