मुंबई / नगर सह्याद्री :
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय खोडके आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
संजय खोडके हे अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यामुळे आता विधीमंडळात पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर संजय घोडके यांनी त्यांना साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर यांच्या जागी खोडके यांना संधी मिळणार आहे. या जागेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.
भाजपकडून कोणाला संधी?
महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून कोणाला संधी?
शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे विधानपरिषदेचे उमेदवार असणार आहेत. चंद्रकांत रघुवंशी आज दुपारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी भाजपच्या तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्याचा विजय झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
रघुवंशी नंदुरबार तालुका आमदार समितीच्या चेअरमनपदी आहेत. त्यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. सूर्यवंशी यांच्या पत्नी सलग चार वेळा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पंधरा वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती सत्ता अबाधित आहे.