मुंबई । नगर सहयाद्री:-
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज सकाळपासून भाजपकडून आमदारांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन गेले आहेत. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. तर मागील सरकारमधील दोन मंत्र्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मंत्रिमंडळ विस्तारात अहिल्यानगरचे भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणारे सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांना फडणवीस सरकारमध्ये वगळण्यात आलेय. भाजपकडून आतापर्यंत १४ जणांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित यांना फोन जाण्याची शक्यता नाही. वादग्रस्त आणि वाचाळविर नेत्यांना मंत्रिपदामधून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी फोन गेल्याचं समजतेय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळात समावेशाचे निश्चित झाल्यानंतर आणि शपथ घेण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी राहाता इथं येत, श्रीक्षेत्र निझर्णीश्वराचे दर्शन घेतले. तसेच लोणी बुद्रुक इथं ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात सहभागी होत दर्शन घेतले. यात्रेनिमित्ताने काढण्यात आलेल्या काठीची विधीवत पूजा राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाली. यानंतर साईदरबारी हजेरी लावत विखेंनी साईसमाधीचे दर्शन घेऊन ते, नागपूरला रवाना झाले असून ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
राधाकृष्ण विखे 1995 ते 2024 या कालावधीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघातून ते सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी कृषी, शालेय शिक्षण, विधी व न्याय, विरोधी पक्षनेते, गृहनिर्माण, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री म्हणून कामकाज संभाळले आहे. नवीन होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खाते कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्ये कुणाला लागली मंत्रिपदाची लॉटरी?
चंद्रशेखर बावनकुळे
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
अतुल सावे
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ
संजय सावकारे
अशोक उईके