Political News : चार वेळा खासदार राहिलेले माजी केंद्रीय मंत्री राजेन गोहेन यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह तब्बल १७ जणांनीही पक्षातून तडकाफडकी राजीनामा दिला आहे.माजी केंद्रीय मंत्री आणि चार वेळा भाजपकडून खासदारपद भूषवलेले राजेन गोहेन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. गोहेन यांच्यासह इतर १७ सदस्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
या सदस्यांनीही राजीनामा देत राजेन गोहेन यांना पाठिंबा दर्शवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांना लिहिलेल्या पत्रात निर्णय जाहीर केला. या घटनेमुळे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेन गोहेन हे आसाममधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. राजीनामा देणारे बहुतेक सदस्य आसामचे आहेत. ‘आसामच्या लोकांना दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत आणि स्थानिक नागरिकांचा विश्वासघात केला. बाहेरच्या लोकांना आसाममध्ये स्थायिक होऊ दिले’ असे कारण सांगत गोहेन यांनी राजीनामा दिला.
राजेन गोहेन हे १९९९ ते २०१९ पर्यंत नागाव संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१६ ते २०१९ पर्यंत रेल्वे मंत्रालयात ते राज्यमंत्री देखील होते. भाजपमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ते चहाच्या व्यवसायामध्येही सक्रीय आहेत, आसाममधील त्यांच्या मालकीच्या चहाच्या बागाही आहेत. अन्य क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचेच सरकार सत्तेत आहे. पुढच्या वर्षी ईशान्येकडील आसाम राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांबाबत घोषणा करणार आहे. भारतीय जनता पक्ष आसाममध्ये विजयाची हॅटट्रीक करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत.