वसंत राठोड यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
अहमदनगर। नगर सहयाद्री-
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय पक्षला पराभवास सामोरे जावे लागले. भाजपचा हक्काचा मतदारसंघ हातातून गेल्याने पक्षातून मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजना अभावी व गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला, असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी तक्रार करून भाजापा शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.
वसंत राठोड यांनी प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रकात शहर व भिंगार मंडलाबाबत अॅड.अभय आगरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकात राठोड यांनी नमूद केले आहे की, शहर जिल्हाअध्यक्ष अभय आगरकर यांनी लोकसभेच्या मतदानाच्या चार दिवस अगोदर अचानक बूथप्रमुखांची यादी दोन वेळा बदलली. नगर शहर, केडगाव, सावेडी ब भिंगार मंडलातील बूथ प्रमुख अचानक का बदलले? भाजपचा सबंध नसलेले इतर पक्षातील पादाधीकारींना भाजपचे बूथ प्रमुख केले. या मागचे नेमके कारण काय? नविन बूथ प्रमुख हे निवडणुकीच्या दिवशीसुद्धा बूथवर उपस्थित नसल्याने मतदानावर याचा मोठा परिणाम झाला. पक्षाचे भिंगार मंडलाध्यक्ष असताना सर्व सूत्र शहराचा एक पदाधिकारी पहात होता. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पक्षाने दिलेले घर चलो अभियाना व इतर कार्यक्रम फक्त वरीष्ठांना फोटो पाठवण्या पुरतेच राबवले गेले.
अशा प्रकारे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांचे एकूण सगळे वागणे हे संशयास्पद आहे. कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन नाही, कार्यकर्त्याबरोबर समन्वय नाही तसेच उत्साह नाही. निवडणुकीच्या काळातच गटातटाचे राजकारण करत पदाधिकाऱ्यांना डावलले. मी स्वतः भिंगार छावणी परिषदेचा उपाध्यक्ष असून सुध्दा त्यांनी नेहमी मला दुय्यम वागणूक देत सक्रीय प्रचार यंत्रणेतून टाळले. ते अध्यक्ष झाल्यापासून गटबाजी करत माझ्यासह अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम व अविश्वास निर्माण झाला.
शहराच्या अध्यक्षांचा असा कारभार संशयास्पद आहे. याचा मोठा परिणाम उमेदवाराच्या मताधिक्यावर झाला आहे. याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होवू नये यासाठी अशा नेतृत्वहीन, गोंधळलेल्या मानसिकतेच्या, व्दिधा मनस्थितीत अडकलेल्या व व्यक्ती द्वेषाने पछाडलेल्या शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकत्याला शहर जिल्हाध्यक्ष पद दयावे. ज्या योगे विधानसभेत नगर शहरातून भाजपाचा आमदार जाईल.