श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
ऑक्टोबर मध्ये सुरू होणारे साखर कारखाने यंदा विधानसभा निवडणुकीमुळे उशिराने सुरू झाले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी संपताच हे ऊसतोड कामगार कारखान्यावर कामासाठी आले असल्याने आता कारखान्याचा परिसर गजबजला आहे. जागोजागी कारखाना परिसराला गावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी, घोड कुकडी पट्ट्यातील ऊस उत्पादन अधिक असल्याने तालुक्यात ३ साखर कारखाने चालू आहेत. परंतु या ऊसतोड कामगारांना निवास, त्यांच्या लहान मुलांना शाळा व सुरक्षिततेची साधने अशा कुठलीही सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कामगारांचे संघर्षमय जीवन सुरूच आहे. निसर्गाची नेहमीच अवकृपा असलेल्या पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील मजूर कुटुंबासह ऊस तोडणी साठी पर जिल्ह्यात जात असतात. कारखान्याच्या आवारात अथवा ज्या भागात ऊस तोडणी सुरू आहे.
अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊस तोडणी साठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच कामगारांचा दिवस व्यतित होत असतो. कारण त्याच्या थंडीतही भल्या पहाटे यांचा दिवस सुरू होतो. यावर्षीची घेतलेली उचल फिटते की नाही फिटते तर पुढील वर्षाची उचल अगोदरच घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. सहा महिने गावी तर सहा महिने कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते. अनेक विद्यार्थी यात शाळाबाह्य होतात. थंडीच्या दिवसात तर कामगारांची सुरक्षा ही रामभरोसेच असते. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार? त्यांच्या व्यथा कोण जाणून घेणार? हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.
मुलांसाठी साखर शाळा सुरू कराव्या
दुष्काळी भाग असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी कारखान्याची उचल घ्यावी लागते. पहाटेपासून थंडीची परवा न करता ऊस तोडणी करावी लागते. दररोज २० ते २५ टन तोडणी होते. पोटासाठी तर काम करावंच लागणार, ऊस तोडणी साठी कुठल्या गावात जायचं हे आम्हालाही माहीत नसतं. आमच्या मुलांना साखर शाळा सुरू करण्यात याव्या अशी मागणी ऊसतोड कामगार वर्ग करीत आहेत.
– सुदाम राठोड, ऊसतोड कामगार, ता. पाचोरा जि. जळगाव