नगर सह्याद्री वेब टीम
महाराष्ट्रात मिनी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाकडूनही तयारी सुरू केली असून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे. दुसरीकडे आयोगाच्या तयारीलाही वेग आला आहे. ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समितीमध्ये मतदान पार पडणार आहे. त्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम यादी आणि मतदाननिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. १४ ऑक्टोबरपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यामुळे महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगामधील खात्रीलायक सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदाच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, आयोगाकडून १ जुलै २०२५ अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. म्हणजेच, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरण्यात येणार आहे.
मागील पाच वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मनपा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार, आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आह. मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन टप्प्यात राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दुसर्या टप्प्यात मुंबई वगळत इतर सर्व मनपाच्या निवडणुका होतील. तर अखेरच्या टप्प्यात मुंबईची निवडणूक होऊ शकते.