मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आणि महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचं कारण मात्र वेगळं आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही, असा धक्कादायक दावा समोर आला आहे. ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024 मध्ये जाहीर केली होती. त्यानंतर राज्यभरात प्रचंड प्रतिसाद लाभला. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली होती.
यानुसार तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांचे पैसे नियमितपणे थेट बँक खात्यात जमा होत आहेत.मात्र आता, या योजनेसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या शून्यावर आली असून, योजना थंडावली का? महिलांचा या योजनेकडे उत्साह ओसरला का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडताळणीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार असून, योग्य वेळी दरमहा मिळणारे 1500 रुपये वाढवले जाणार आहेत. दरम्यान, योजना लागू केल्यानंतर काही अपात्र लाभार्थींनी गैरफायदा घेतल्याचे प्रकार उघडकीस आले. अनेकांनी बनावट ओळख, चुकीची माहिती किंवा छायाचित्र बदलून अर्ज केले. काहींनी तर मोटारसायकलचा फोटो लावून अर्ज मंजूर करून घेतल्याचे ही प्रकार समोर आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश देण्यात आले असून, अनधिकृत लाभार्थ्यांचे मानधन थांबवण्यात आले आहे. योजनेतून वगळलेल्या किंवा चुकीच्या कारणांमुळे वंचित राहिलेल्या पात्र महिलांबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. पात्र भगिनींवर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.