बीड / नगर सह्याद्री –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे सीआयडी आणि एसआयटीच्या तपासातून समोर आल्या आहेत. आरोपी सुदर्शन घुले याने देखील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली असल्याचं कबुल केलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.
घुलेने दिलेल्या जबाबानंतर देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक माहिती समोर आली आहे. देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. या वाहनामधून १९ पुरावे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल समोर आला आहे. तब्बल १९ पुरावे काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये सापडले आहेत. वाहनावरील ठसे आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनातून दिवंगत संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. नंतर मारहाणीसाठी त्यांना शेतशिवारात नेण्यात आले. काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनाला ताब्यात घेतल्यानंतर फॉरेन्सिक टीमकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली.
नंतर तपासणीत काही ठसे आढळून आले आहेत. या वाहनाच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर २ ठसे आढळून आले असून, हे फिंगरप्रिंट सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत. असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोने दिला आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुले याची आहे.
सुदर्शन घुलेनं पोलिसांना काय काय सांगितलं?
सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर जबाबात संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली दिली. ‘आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत संरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते. त्यादिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आम्हाला मारहाण केली. तसेच अपमानही केला. देशमुखांनी मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आम्हाला चॅलेंज दिलं होतं. या गोष्टीचा आम्हाला राग आला होता. त्यामुळे अपहरण करून देशमुख यांची हत्या केली’ अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली.