बीड / नगर सह्याद्री –
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. तर इतर आरोपी कारागृहात आहे. काल या प्रकरणाची पहिली सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या हत्येला आता चार महिने लोटले आहेत. प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे. कोठडी दरम्यान त्याने ही कबुली दिल्याचे समोर येत आहे. तर याप्रकरणात वाल्मिक कराड याने काय दिला जबाब?
सुदर्शन घुलेचा जबाब काय?
सरपंच संतोष देशमुख यांच्याशी अवादा कंपनीच्या टॉवरप्रकरणात आरोपींशी वाद उद्भवला होता. गावातील कंपनीच्या टॉवरवरील कामगाराला आरोपींनी मारहाण केली होती. त्यावेळी संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावरून सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासोबत देशमुख यांचा पहिला वाद झाला. त्यानंतर आरोपींनी 6 डिसेबरपासून त्यांची हत्या करण्याचा घाट घातला. या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड हाच मार्गदर्शन करत असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.
तर या प्रकरणात आता माणुसकीला काळिमा फासणारा आरोपी सुदर्शन घुले याने खुनाची कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली घुले याने दिली. यामुळे आता याप्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता हे आता समोर आले आहे.
वाल्मिक कराड काय म्हणाला?
याप्रकरणातील आका असलेला वाल्मिक कराड हाच खरा हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येतो. या खून प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार हे आरोपी आहे. 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तर आता सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिली आहे. तर घुले याच्यासोबतच जयराम चाटे आणि महेश केदार याने सुद्धा देशमुख यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. तर वाल्मिक कराडचा जबाब अजून समोर आला नाही.