मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजना सुरू करताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या, मात्र अनेक महिलांनी या अटीचं उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, आता अशा महिलांची नाव या योजनेतून वगळ्याचं काम सुरू आहे.
ही योजना ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे, मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलं आहे. एवढंच नाही तर एक कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो, मात्र काही ठिकाणी दोन पेक्षा अधिक महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. ही योजना ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे, अशाच महिलांसाठी आहे, मात्र अनेक ठिकाणी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांचे नावं या योजनेतून कमी केली जाते आहे.
कळस म्हणजे महिलाच नाही तर चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे. राज्यातील 14 हजारांपेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलं आहे. ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
ज्या गरिब महिला आहेत, त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू आहे, त्याच्यात मधल्या काळात पण तुम्ही पाहिलं, काही महिला ज्या सरकारी नोकरी करत होत्या त्यांची पण नावं आली, जसं जसं एक- एक गोष्टी लक्षात येतायेत तस-तशी आम्ही ती नावं कमी करत आहोत, या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही, जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू, त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे -पुढे पाहाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.