बीड / नगर सह्याद्री
मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गंभीर आरोप केले होते, निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला होता. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खळबळजनक गौप्यस्पोट केला होता. कासले यांनी पुरावा म्हणून आपलं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं होतं. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची देखील आपल्याला ऑफर देण्यात आली होती. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर संदर्भातील चर्चा बंद दाराआड झाली, असंही कासले यांनी म्हटलं होतं.
मात्र आता रंजित कासले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आपल्याला ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप करताना त्यांनी ज्या कंपनीचा संदर्भ दिला होता, त्या कंपनीच्या संचालकांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांनी यासंदर्भात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केला आहे. आपण रंजित कासले यांना जे पैसे पाठवले, ते त्यांना उसने म्हणून देण्यात आले होते. मुलाची फी भरण्यासाठी म्हणून त्यांना डिसेंबर महिन्यात आपन ते पैसे दिले असं सुदर्शन काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात काही पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता रंजित कासले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्याला निवडणूक काळात दहा लाख रुपये दिल्याचा आरोप रंजित कासले यांनी केला होता. रंजित कासले यांच्या या आरोपांने खळबळ उडाली होती. तसेच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देखील आपल्याला देण्यात आली होती, असा दावा देखील कासले यांनी केला आहे. मात्र आता या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे कासले यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.