मुंबई / नगर सह्याद्री –
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोर्टाकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. या बनावट एन्काउंटर मधील सबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाकडून राज्य सरकारला देण्यात आले. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. अखेर हायकोर्टाने आज राज्य सरकारला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
तसेच मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. तसेच या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकणार आहे.
काय आहे नेमके बदलापूर अत्याचार प्रकरण?
बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते.
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदेने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.