अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पक्षाचे जेष्ठ आमदार संग्राम जगताप यांची अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील “निवडणूक प्रभारी” म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे.
येत्या काळात नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीच्या तयारीस गती देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने योग्य नियोजन करून पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समन्वय राखण्यासाठी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
या नियुक्तीमुळे अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवचैतन्य लाभेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. संग्राम जगताप यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयासाठी ते निर्णायक भूमिका निभावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



