अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या समयोजानाची प्रक्रिया राबवली जाणार होती. तथापि, विध्यार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाईन लिंक नसल्यामुळे शिक्षक तांत्रिक दृष्ट्या अतिरिक्त ठरत होते. यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले आणि माजी सभापती रामदास भोर यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन केले. कार्ले-भोर यांनी केलेल्या आंदोलनामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी समयोजन स्थगित करण्याची मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपशिक्षण अधिकार्यांनी समयोजन दि. ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित केले असल्याचे पत्र दिले. त्याचप्रमाणे, आधार लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांची फेरपुस्तक नोंदणी करून नवीन संच मान्यता देण्याची मागणी शिक्षण उप संचालकांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
परंतु आधार लिंकिंगच्या समस्येमुळे शिक्षकांच्या संख्येत घट होत आहे. मागील वर्षी अशाच अडचणीमुळे शासनाने गटशिक्षण अधिकार्यांसोबत संयुक्त पाहणी करून दुरुस्ती केली होती. यंदाही अशीच सुविधा देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मीना शिवगुंडे, गट शिक्षण अधिकारी बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख डॉ. संजय कळमकर, केंद्रप्रमुख संजय धामणे उपस्थित होते.