अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतपिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेटरपर्यंतच्या मर्यादेत प्रति हेटरी जाहीर केलेले अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित शेतकर्यांच्या खात्यात ५२८ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तसेच रब्बी हंगामातील बी बियाण्यांसाठी ३६४ कोटी ४० लाख ८५ हजार रुपये इतके अनुदानही अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
नुकसानीचे हे अनुदान नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले असून आतापर्यंत विभागातील सर्वच जिल्ह्यातील मिळून १६ लाख ५९ हजार ५१९ शेतकर्यांच्या खात्यात ९०३ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये एवढे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. ज्या शेतकर्यांचा अॅग्री स्टॅक आयडी तयार करण्यात आलेला नाही, अशा शेतकर्यांना अॅग्री स्टॅक आयडी तयार करण्याबाबत विशेष मोहीम स्वरुपात कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. यासंदर्भात येत्या सात दिवसांत गावनिहाय अॅग्री स्टॅक मध्ये नोंदणी करावयाच्या शेतकर्यांची माहिती संकलित करून त्यांची तात्काळ नोंदणी करण्याबाबतचे निर्देश विभागातील जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागास देण्यात आले आहेत.
नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत माहे ०१ जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची भरपाई म्हणून शासनाने कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेटरी रुपये आठ हजार ५००, बागायती पिकांसाठी प्रति हेटरी १७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेटरी रुपये २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे तीन हेटरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यासाठी २०१ कोटी ८९ लाख ७७ हजार रुपये, धुळे जिल्ह्यासाठी पाच कोटी १६ लाख ६१ हजार, नंदुरबार जिल्ह्यासाठी ३७ लाख ३२ हजार, जळगाव जिल्ह्यासाठी १६८ कोटी १७ लाख ०९ हजार व नगर जिल्ह्यासाठी ५२८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही सारी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.याशिवाय, खरीप २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना रब्बी हंगामकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता हेटरी १० हजार रुपये इतकी रक्कम ही विशेष मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यासाठी १८० कोटी १९ लाख ५४ हजार रुपये, धुळे जिल्ह्यासाठी पाच कोटी ७४ लाख ३२ हजार, नंदुरबार २९ लाख १९ हजार, जळगाव १३३ कोटी २४ लाख १८ हजार तर नगर जिल्ह्यासाठी ३६४ कोटी ४० लाख ८५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले आहे. ही सारी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांची अॅग्री स्टॅक मध्ये नोंदणी झालेली आहे, अशा शेतकर्यांना भविष्यात मदतीचे वाटप करताना त्यांना ई- केवायसी करण्याची गरज भासणार नसल्याने सर्व शेतकर्यांनी अॅग्री स्टॅक मध्ये आपली नोंदणी करण्याबाबतचे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या शेतकर्यांना आज रोजी अॅग्री स्टॅक आयडी उपलब्ध नाही अशा शेतकर्यांनी ई – केवायसी केल्यास त्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम तात्काळ जमा होऊ शकते. या अनुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकार्यांना अनुदान वाटप प्रलंबित असलेल्या शेतकर्यांची यादी गावनिहाय तलाठी यांच्यामार्फत चावडीवर चिकटवून मदतीस प्रलंबित असलेल्या शेतकर्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
नगर जिल्ह्याला अतिवृष्टीचे ५२८ कोटी
तर रब्बी हंगामासाठी ३६४ कोटी रुपये
मागील जून ते सप्टेंबर या कालावधील अतिवृष्टी, पूर यामुळे नुकसान झालेल्या व तीन हेक्टरच्या मर्यादेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख ४९ हजार ७१६ शेतकर्यांच्या खात्यावर ५२८ कोटी रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामाच्या बी बियाण्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये इतके अनुदान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख ५३ हजार २३५ शेतकर्यांच्या खात्यावर ३६४ कोटी ४० लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.



