अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नियुक्तीचा आदेश देण्यासाठी खाजगी कंपनीमार्फत विद्युत वितरण कंपनीसाठी बाह्यस्त्रोत यंत्रचालकास 15 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जी. के. एंटरप्राइजेसच्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्याची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी, की फिर्यादी हा जुलै 2021 पासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम कक्षांतर्गत 33/केव्ही खडका उपकेंद्र येथे खाजगी कंपनीमार्फत बाह्यस्त्रोत यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. विद्युत वितरण कंपनीने 05 डिसेंबर 2024 पासून बाह्यस्त्रोत कर्मचारी भरण्याचे कंत्राट अहिल्यानगरचे जी. के. एंटरप्राइजेसचे चालक अंबादास कदम यांना दिले आहे.
फिर्यादी हा बाह्यस्त्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्तीचा आदेश घेण्याकरिता अहिल्यानगर येथील जी. के. एंटरप्राइजेसच्या कार्यालयात गेला होता. तेव्हा तेथील खाजगी कर्मचारी प्रदीप उर्फ विशाल विष्णू देवतरसे (वय- 32 वर्षे, लिपिक), विनोद बाबासाहेब दळवी (वय-28, लिपिक) यांनी फिर्यादीस 15 हजार रुपये घेतल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नका असे अंबादास कदम साहेबांनी आम्हाला सांगितले आहे, तेव्हा तेवढी रक्कम द्या म्हणजे तुम्हाला नियुक्त आदेश मिळेल असे सांगितले.
तेव्हा फिर्यादीने 13 डिसेंबर 2024 रोजी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली. विभागाने या संदर्भात पडताळणी केली. अहिल्यानगर येथील जी. के. एंटरप्राइजेसच्या कार्यालयात 15 हजार रुपये लाच देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार संबंधित वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जी. के. एंटरप्राइजेस मध्ये सापळा लावला. त्यानुसार लाच स्वीकारताना तेथील कर्मचारी प्रदीप उर्फ विशाल देवतरसे यांनी पंचासमक्ष 15 हजार रुपये लाचेची रक्क़म स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
यावेळी अन्य एक लिपिक विनोद दळवी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जी.के. एंटरप्राइजेसचे चालक अंबादास कदम यांनी त्यांच्या कार्यालयातील खाजगी कर्मचारी प्रदीप उर्फ विशाल देवतरसे व विनोद दळवी यांना तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिले व लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. या बाबत तिन्ही आरोपींविरुद्ध अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.