मुंबई । नगर सहयाद्री:-
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन लवकरच वाढणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांच्या विविध मागण्या मान्य करत सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकी मांडणार असल्याचे आश्वासन दिले असून या यशस्वी आंदोलनामुळे सरपंचांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि ग्रामविकासाला देखील नवीन गती मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीनं आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले होते. सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे, ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे, मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे, ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी, संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे,संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा,ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या आंदोलनाला यश आलं आहे. कारण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील, तर 15 लाखांपर्यंत कामे द्यावीत अशी मागणी केली होती. पण कोर्टाचा निर्णय असल्याने 3 लाखांपर्यंत कामे देता येतात. त्यात देखील सुवर्णमध्य काढला जाईल असं महाजन यांनी सांगितलं. इतर तांत्रिक मागण्या आहेत, त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील. प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल असं महाजन यांनी सांगितलं.