माय नगर वेब टीम
Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेबंर २०२५ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणुका कधी होणार याची वाट पाहिली जात असून, या निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महसूल विभाग प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील ११२ तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत हे सर्व अधिकारी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर राहतील. त्यानंतर रुजू झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात येत असून, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आवश्यक असलेली उपजिल्हाधिकारी स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी (ERO) पदे रिक्त होती. त्यामुळे आयोगाने सरकारला या रिक्त पदांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण होत असलेली प्रक्रियेला या निर्णयामुळे पुन्हा गती घेणार आहे. पण जर अधिकारी पूर्णपणे हजर होईपर्यंत दुसरा टप्पा जाहीर करणे शक्य नसल्याचे देखील म्हटले जात होते.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणुका देखील महत्वाच्या आहेत. पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. निवडणुकीचे बिगुल ५ डिसेंबरपासून वाजू शकते, अशी शक्यता आहे.



