पुणे / नगर सह्याद्री : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा जगजाहीर आहे. नुकतेच त्यांनी शरद पवार यांच्यावर बंडावरून घणाघात केला आहे.
बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्याची शरद पवार यांना लक्ष केले होते. बरीच वर्षे त्यांचे ऐकले आता माझे ऐका, असे अजित पवार म्हणाले होते. दरम्यान यावेळी त्यांनी काही शासकीय धोरणांवरही भाष्य केलं.
त्यात, राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याच पवार म्हणाले. ”महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले असून मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
सध्याही अनेकजण आपल्या नावानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही अशी अनेक नावे आहेत.